मुंबई, १० ऑगस्ट / प्रतिनिधी
‘एअर सस्पेन्सर’ निमआराम
एअर सस्पेन्सर बसविण्यात येणाऱ्या एसटीच्या नव्या निमआराम बसेसचे बाह्य रंगरूप जुन्या बसेसप्रमाणेच असले तरी, या जांभळ्या-पांढऱ्या रंगसंगतीतील गाडय़ांची लांबी १०.५ मीटरऐवजी १२ मीटर इतकी असेल. परिणामी त्यांच्यातील आसनसंख्या ४७ इतकी झाली असून, ही संख्या आठने जास्त आहे. सुमारे साडेतीन हजार रुपये किंमतीच्या पारंपरिक स्प्रिंग सस्पेंसरच्या तुलनेत एअर सस्पेंसरसाठी ९० हजार रुपये मोजावे लागणार असले, तरी एअर सस्पेंसरमुळे अगदी शेवटच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांनासुद्धा या नव्या बसेसमध्ये धक्के जाणवणार नाहीत, असे नमूद करून या प्रकारच्या १६० निमआराम बसेस बांधण्यात येणार असल्याचे दीपक कपूर यांनी स्पष्ट केले.
एसटीच्या यात्रा-सहल आयोजनाच्या गाडीला ‘स्टार्टर’ देऊन आगाराबाहेर नेण्याच्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांच्या प्रयत्नांना मागील दोन-अडीच वर्षांत यश आलेले नाही. असे असताना एसटीची ही धक्का-स्टार्ट यात्रा सहल गाडी धक्का देऊन रस्त्यावर आणण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
सुधाकर परिचारक यांनी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातील समिती सभागृहात मार्च २००८ मध्ये आयोजित केलेल्या एका भरगच्च पत्रकार परिषदेत उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीतर्फे धार्मिक स्थळांच्या यात्रा-सहलींचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. सुमारे अडीच वर्षांपूर्वी केलेली ही घोषणा अद्यापही कागदावरच असताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज पुन्हा एकदा एसटीतर्फे उत्पन्न वाढीसाठी यात्रा-सहली आयोजित केल्या जातील, असे जाहीर केले. विशेष म्हणजे विखे-पाटील यांनी ज्यावेळी हे घोषित केले त्यावेळी परिचारक त्यांच्या शेजारील खुर्चीत बसले होते आणि एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातील समिती सभागृहाचे स्थानही बदलले नव्हते.
आरामदायी प्रवासासाठी एसटीतर्फे एअर सस्पेंशन असलेल्या १६० निमआराम बसेस बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी पुण्यातील दापोडी कार्यशाळेत बांधलेल्या पहिल्या पाच बसेसचे आज मुंबई सेंट्रल आगारात उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी, राधाकृष्ण विखे-पाटील, सुधाकर परिचारक, राज्यमंत्री गुलाबराव देवकर, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत विखे-पाटील यांनी एसटीला राज्यातील धार्मिक स्थळांच्या यात्रा-सहली आयोजित करण्याची सूचना केली. त्यामुळे यात्रा-सहल आयोजनाची गाडी केवळ घोषणांच्या इंधनावर परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष कशी वेगाने दामटत आहेत, याबद्दलची जोरदार चर्चा एसटीच्या वर्तुळात रंगली होती.
राज्यातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने अनेक उपाययोजना केल्या असल्याचे विखे-पाटील यांनी यावेळी नमूद केले. मात्र एसटीच्या शहरी बसेससाठी ३.५ टक्के, वातानुकूलित बसेससाठी ५.५ टक्के आणि साध्या बसेससाठी १७.५ टक्के प्रवासी कर लावून राज्य शासन ग्रामीण प्रवाशांवर अन्याय करीत नाही का? या प्रश्नामुळे निरुत्तर झालेल्या विखे-पाटील यांनी एसटीमध्ये देण्यात येणाऱ्या सवलतींवर होणाऱ्या सुमारे ६००-७०० कोटी रुपयांच्या खर्चाची प्रतिपूर्ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने करावीच लागणार, असे थातूर मातूर उत्तर दिले. एसटीच्या प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रवासी कर रचनेत बदल करण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली असल्याचे स्पष्ट करताना आंध्र प्रदेश एसटी महामंडळाच्या सुमारे १०० व्होल्वो बसेस दररोज शिर्डीला येत असल्याची माहिती विखे-पाटील यांनी दिली. मात्र शिर्डीकरिता आंध्र प्रदेश एसटीच्या व्होल्वो इतक्या मोठय़ा संख्येने चालत असतील, तर मुंबई-शिर्डी आणि शिर्डी-हैदराबाद मार्गावर एसटीची प्रत्येक एक व्होल्वोसुद्धा का धावू शकत नाही, अशी या प्रश्नावर विखे-पाटील यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. शहरी वाहतूक आणि बीओटी तत्त्वावर एसटीच्या जागांचा विकास करण्यासाठी ‘अर्बन ट्रान्स्पोर्ट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’ स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव येत्या १५ दिवसांत एसटीतर्फे राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
Wednesday, August 11, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
CWD have made these buses literally a Dabba!
ReplyDelete