Wednesday, September 16, 2009

CNG Buses.

एसटीच्या ताफ्यात ६० सीएनजी बस
टू बाय टू सीटची रचना... ४५ सीट... डबल डोअर... आणि महत्त्वाचे म्हणजे इंधनासाठी पर्यावरणाला अनुकूल असा सीएनजी गॅस... अशी सारी वैशिष्ट्ये असलेल्या तब्बल ६० बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत असून या महिनाअखेरीस त्या मुंबई-पनवेल-वाशी मार्गावर तसेच पुणे परिसरात धावू लागतील. 

सीएनजीवर धावणाऱ्या २५० बस वर्षअखेरीपर्यंत ताफ्यात दाखल करण्याचे उदिष्ट महामंडळाच्या डोळ्यांपुढे आहे. त्यातील दोन बसगाड्या मध्यंतरी मुंबई-पनवेल मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या. त्या थ्री बाय टू सीटच्या आणि सिंगल डोअरच्या होत्या. त्यांचा प्रवास कमी अंतराचा असल्याने प्रवासात येणाऱ्या बसस्टॉपची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत एकाच दरवाजातून उतरताना खूप गदीर् होत असल्याने दोन दरवाजे करण्याची मागणी प्रवाशांकडून आली. एसटीच्या औरंगाबाद व पुण्याच्या वर्कशॉपमधील इंजिनीअर मंडळींनी त्यानुसार बसच्या रचनेत बदल केले. या नव्या रचनेच्या पहिल्या पाच बसगाड्या शनिवारपर्यंत ताफ्यात सहभागी होतील. एकूण साठ बसगाड्या ताफ्यात सामील होणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश गुप्ता यांनी दिली. 

त्यातील १५-२० बसगाड्या पुण्यासाठी तर इतर मुंबईसाठी असतील. अशोक लेलँडच्या ४६, आणि टाटा मोटर्सच्या १४ बसगाड्यांचा त्यात समावेश आहे. डिझेलवर धावणाऱ्या बसची किंमत सर्वसाधारणपणे साडेदहा लाख रुपये आहे. सीएनजी बसची किंमत १५ ते १५.५ लाखांच्या घरात आहे. एकदा गॅस भरला की बस सुमारे ३०० ते ३५० किमीपर्यंत धावते. 

Maharashtra Times, 16 Sep 2009