http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=18817:2009-10-27-18-16-58&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56मध्य प्रदेशातील खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २७ ऑक्टोबर , रात्री १२ वाजतापासून एस.टी.ची मध्य प्रदेशातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका विदर्भातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.
चुकीच्या ठिकाणी वाहने उभी केल्याप्रकरणी एस.टी.च्या सहा चालक, वाहकांना अलीकडेच मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली व वाहने ताब्यात घेतली. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे राज्य परिवहन मंडळाचे मत आहे. मध्यप्रदेशमध्ये शासनाची बस सेवा नाही; संपूर्ण सार्वजनिक वाहतूक खाजगी वाहतूकदारांकडे कंत्राटी पद्धतीवर देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या बससेवेमुळे खाजगी वाहतूकदारांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने ते संतप्त होते. त्यामुळे त्यांच्याच तक्रारीवरून इंदोर पोलिसांनी महाराष्ट्रातून गेलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचा दावा राज्य परिवहन मंडळाने केला आहे.
राज्यातील कर्मचाऱ्यांना मध्यप्रदेश पोलीस अशा प्रकारे त्रास देत असतील आणि त्यात मध्यप्रदेश सरकार हस्तक्षेप न करता खाजगी वाहतूकदारांच्या बाजूने उभे राहात असेल तर सेवा बंद करण्याशिवाय पर्याय नाही, या निर्णयाप्रत राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी आल्याने त्यांनी महामंडळाच्या मुंबई मुख्यालयाने एस.टी.ची मध्यप्रदेशातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजावणी उद्या मंगळवारी रात्री १२ वाजतापासून होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यादरम्यान सांस्कृतिक संबंध असून इंदूर, जबलपूर, सिवनी या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मराठी बांधव राहतात. एकेकाळी नागपूर ही मध्य भारताची राजधानी राहिली असल्याने मध्य प्रदेशातील अनेक शहरांशी नागपूरचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी संबंध आहे. त्यामुळेच
महाराष्ट्राच्या अन्य शहरांप्रमाणे नागपूर, अमरावती येथून मध्यप्रदेशातील विविध शहरासाठी एस.टी.च्या फेऱ्या सुरू आहेत. तसेच मध्यप्रदेशातील खाजगी बसेसही राज्यात धावतात. विशेष बाब म्हणजे मध्य प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नागपुरात एक आगारही आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती येथून मध्य प्रदेशातील विविध शहरात सुमारे ५० बसेस दररोज ये-जा करतात. यामध्ये नागपूर येथून भोपाळ, पांढुर्णा, इंदूर, जबलपूर, पचमढी, कान्हा किसली, छिंदवाडा, रामाकोना, सौंसर, सिवनी, बेरडी, मंडला, बालाघाट शहरासाठी महाराष्ट्राच्या बसेस धावतात. अमरावती येथून इंदूर, पांढुर्णा, छिंदवाडा, सिवनी, मुलताई, भोपाळ खंडवा, बैतुल आदी शहरांसाठी बसेस उपलब्ध आहेत.
या सर्व बसेस मंगळवारपासून मध्यप्रदेशच्या सीमेवरील बस थांब्यापर्यंत जातील, अशी माहिती नागपूरचे विभागीय वाहतुक नियंत्रक सुर्यकांत अंबाडेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.