Friday, August 3, 2012

कोकणात पुन्हा लेलॅंडच्या एसटी बसेस धावणार

http://online2.esakal.com/esakal/20120803/5281412122870622291.htm

स्पेअरपार्टची कमतरता आणि कोकणातील चढ-उताराच्या रस्त्यावर सातत्याने "ब्रेकडाऊन' होणाऱ्या बसेस ही सिंधुदुर्गासह कोकणातील इतर जिल्ह्यांतील परिस्थिती आता बदलणार आहे. कोकणातील रस्त्यांवर पूर्वीप्रमाणेच लेलॅंड कंपनीच्या बसेस धावणार असल्याने प्रवाशांना चांगली सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. येत्या डिसेंबरपासून याबाबतची कार्यवाही करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात टाटा आणि लेलॅंड कंपनीच्या बसेस आहेत. यात कोकणातील चार जिल्ह्यांसाठी लेलॅंड कंपनीच्या बसेस ठेवण्यात आल्या होत्या. येथील चढ-उतार, वळणाचे रस्ते तसेच अतिपावसाच्या कालावधीत त्या चांगल्या सेवा बजावत होत्या; मात्र एसटी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष श्री. खोब्रागडे यांच्या कार्यकाळात उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे कोकणातही टाटा कंपनीच्या बसेस सुरू केल्या. सिंधुदुर्गालगतच्या गोवा राज्यात या बसेसची बांधणी होऊ लागली. गेली पाच वर्षे या कंपनीच्या बसेस कोकणातील मार्गावर सुरू असल्या तरी त्या सातत्याने "ब्रेकडाऊन' होण्याचे प्रमाण वाढले. तसेच या कंपनीच्या बसेसचे स्पेअरपार्ट कोकणातील जिल्ह्यात उपलब्ध होत नसल्याने एसटी महामंडळाची डोकेदुखी आणखीच वाढली. एकाच वेळेस अनेक बसेस दुरुस्तीसाठी बंद राहत असल्याने त्याचा परिणाम वाहतूक सेवेवरही होऊ लागला. तसेच भारमानही घटले. एसटीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ लागल्यानंतर कोकणातील मार्गावर लेलॅंड कंपनीच्या बसेस पुन्हा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी टाटा कंपनीच्या बसेस सुरू ठेवल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे चालक-वाहकांसह दुरुस्ती कारागिरांमध्ये समाधान व्यक्‍त होत आहे. सपाट रस्त्यावर सध्याच्या बसेसमध्ये फारशी बिघाडाची समस्या उद्‌भवत नाही; मात्र चढ-उतार, रस्त्यावरील खड्डे यातून वाहतूक करताना सध्याच्या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले होते. तुलनेत जुन्या लेलॅंड कंपनीच्या बसेस चांगली सेवा देत असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते.

1 comment:

  1. i have seen before 15 years, in there was no single Tata bus in all konkan but before 5 years i surprised when i saw tata bus was running on internal konkan roads.

    let it be but atleast now we can listen again roaring leyland buses on konkan roads

    ReplyDelete