Thursday, March 11, 2010

‘एव्हरग्रीन’ एशियाडचे जांभुळाख्यान!

एसटीच्या गाडय़ांना सर्रासपणे लावण्यात येणाऱ्या ‘लाल डब्बा’ या उपरोधिक बिरुदावलीला छेद देणारी गाडी म्हणजे एशियाड. तब्बल २८ वर्षांपूर्वी एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या पांढऱ्या-हिरव्या रंगातील एशियाडने महाराष्ट्रातील प्रवाशांवर केलेले गारुड आजही कायम आहे. व्होल्वो-मर्सिडिजच्या जमान्यातही लोकप्रियतेच्या बाबतीत तसूभरही मागे नसलेली ‘एव्हरग्रीन’ एशियाड आता जांभळ्या रंगात अवतरणार आहे. पांढरा-हिरवा रंग आणि त्यावर निळी पट्टी.. एशियाडची ही गेल्या २८ वर्षांची रंगसंगती बदलून एसटीने ती पांढरी-जांभळी केली आहे. खिडकीच्या वरील भागात जांभळा तर, खालील भागात पांढरा आणि आणि मागील चाकाच्या वरील बाजूस जांभळा पट्टा अशा नव्या रंगसंगतीतील अनेक एशियाड बसेस आता राज्यातील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. बदलत्या रंगसंगतीतील सुमारे १०० नव्या गाडय़ा रस्त्यांवर आणल्या आहेत, अशी माहिती एसटीतील अधिकृत सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे एशियाडचा हा नवा रंग काहीसा गडद असला तरी, मुंबईतील नव्या एमयूटीपी लोकलच्या रंगसंगतीशी साधम्र्य सांगणारा आहे. साध्या गाडय़ांपेक्षा आरामदायी आसन व्यवस्था, मजबूत बांधणी, चालकांच्या वेगळ्या केबिनमुळे इंजिनाच्या आवाजापासून प्रवासांची सुटका, आकर्षक अंतर्गत रचना यासारख्या वैशिष्टय़ांमुळे एशियाड बसेस प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या. बैठक व्यवस्थेखेरीज या बसेसच्या अंतर्बा'ा रचनेत गेल्या २८ वर्षांत फारसा बदल केलेला नाही. आधीपासून ‘थ्री बाय टू’ असलेली एशियाडमधील बैठकव्यवस्था गेल्या काही वर्षांपासून ‘टू बाय टू’ करण्यात आली असून, साध्याऐवजी अधिक आरामदायी आसनेदेखील बसविण्यात आली आहेत. सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे ९७० एशियाड बसेस असून जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणांखेरीज राज्यातील महत्त्वाच्या शहरांदरम्यान या बसेस धावत आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन एसटीकडून यंदा ५०० अधिक एशियाड बसेस बांधण्यात येत आहेत. गोव्यातील ‘एसीजीएल’ या खासगी कंपनीकडे हे काम सोपविले असून, सदर कंपनीकडून बांधलेल्या सर्व बसेस नव्या रंगसंगतीतील असतील, अशी माहिती एसटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. दिल्लीमध्ये १९८२ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळांडूंची ने-आण करण्यासाठी एसटीने २०० बसेस बांधून दिल्या होत्या. आशियाई खेळ संपल्यानंतर परतलेल्या या बसेसपैकी १५० बसेस आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाला आणि ५० भारतीय लष्कराला विकल्या. उरलेल्या ५० बसेसच्या सहाय्याने दादर-पुणे बससेवा सुरू करण्यात आली. एसटीने त्यांना निमआराम नाव दिले होते. मात्र आशियाई खेळांसाठी वापरल्या गेल्याने त्यांचे एशियाड हेच नाव अधिक लोकप्रिय झाल्याचे नमूद करून एका शासकीय उपक्रमाने इतक्या उच्च प्रतीच्या बसेस बांधल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील या बसेसचे कौतूक केले होते, अशी आठवण एसटीतील अधिकारी सांगतात. परिवर्तन बसेसच्या निमित्ताने २००६ पासून एसटीने साध्या बसेसला ‘टॉमेटो रेड’ रंग देण्यास सुरुवात केली आहे. वातानुकूलित बसेससाठी रंगाचे कोणतेही बंधन नाही. मात्र एसटीच्या सर्व बसेसची रंगसंगती अधिक आकर्षक करण्यासाठी विद्यमान परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सूचनेवरून एसटीने जे. जे. कला महाविद्यालयाला पत्र लिहून आपल्या ताफ्यातील सर्व प्रकारच्या बसेसच्या रंगसंगतीबाबत संकल्पचित्रे मागविली आहेत. त्यामुळे एशियाड बसेसवर २८ वर्षांनंतर एसटीने चढविलेला ‘जांभळा साज’ कदाचित अल्पजिवी ठरण्याची शक्यता आहे.
नवी रंगसंगती अवैध ?
एसटीने पांढऱ्या-जांभळ्या रंगसंगतीतील सुमारे १०० बसेस रस्त्यावर आणल्या आहेत. मात्र महाराष्ट्र मोटर वाहन नियमाच्या कलम १३७ (४) नुसार या रंगसंगतीला राज्य परिवहन प्राधिकरणाची (एसटीए) मान्यता घेणे आवश्यक आहे. ती मिळविण्यासाठी एसटीकडून ‘एसटीए’कडे अर्ज केला असला तरी, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे एशियाडची रंगसंगती अवैध असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

1 comment: