रंगसंगतीमधील बदलासाठी ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट्स’ची मदत घेणार
मुंबई, १५ फेब्रुवारी
महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या एसटीच्या रुंगरुपात नजिकच्या भविष्यकाळात काही आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. एसटीच्या बसेस अधिकाधिक आकर्षक, मजबूत आणि प्रवासीभिमूख करण्यासाठी एसटी महामंडळाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. बसेसची नवीन रंगसंगती ठरविण्यासाठी जे. जे. कला महाविद्यालयाकडून एसटीने रंगसंगतीची संकल्पचित्रे मागविली असून, त्यांच्या बांधणीतील संभाव्य बदलांचे आराखडे बनविण्याचे कामही हाती घेतले आहे.
राज्याचे परिवहनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्याच्या अखेरीस एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात एक बैठक पार पडली होती. या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला होता. एसटी बसेसची रंगसंगती बदलण्यासाठी जे. जे. कला महाविद्यालयाकडून विविध रंगसंगतीचे १० वेगवेगळे संच मागविण्याची सूचना मंत्रीमहोदयांनी केली होती. हे काम दोन महिन्यांत पार पाडावे, असे त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना बजावले होते.
रंग देण्याच्या पारंपरिक पद्धतीत बदल करून एसटीची रंगसंगती अधिक आकर्षक व टिकाऊ करण्यासाठी मंत्रीमहोदयांनी हा बदल सुचविला होता. त्यानुसार नुकतेच काही दिवसांपूर्वी जे. जे. कला महाविद्यालयास पत्र पाठवून एसटीच्या सर्व प्रकारच्या गाडय़ांसाठी रंगसंगतीची संकल्पचित्र मागविण्यात आल्याचे एसटीच्या अभियांत्रिकी विभागातील सूत्रांनी सांगितले.
साध्या बसेसचा लाल-पिवळा रंग वर्षांनुवर्षे न बदलल्याने एसटीच्या बसेसला सर्रासपणे लाल डबा म्हणून संबोधले जाते. हे उपरोधिक बिरुद पुसण्यासाठी २००६ मध्ये एसटीने टॉमेटो रेड रंगातील परिवर्तन बसेसच्या बांधणीचे काम हाती घेतले. रंग आणि आसनव्यवस्थेखेरीज बसेसच्या बांधणीत फारसा फरक नसल्याने व रंग काही काळातच फिक्कट पडत असल्याने एसटीच्या बसेसला चिटकलले लाल डबा हे संबोधन कायम आहे.
रंगसंगतीखेरीज बसेसच्या बांधणीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची सूचना विखे-पाटील यांनी एसटी महामंडळाला केली आहे. एसटीच्या यंत्र अभियांत्रिकी विभागावर ही जबाबदारी टाकण्यात आली असून, त्यासाठी १८० दिवसांची मुदत दिली आहे. त्यानुसार एसटीच्या बसेसचा सध्याचा पारंपरिक लूक बदलून त्यांची बांधणी अधिक आकर्षक व मजबूत कशी करता येईल, या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली असल्याचेही एसटीतील सूत्रांनी नमूद केले.
दररोज सुमारे ६० लाख प्रवाशांची वाहतूक करणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओळखली जाते. राज्यातील खेडय़ापाडय़ांखेरीज दूर्गम डोंगराळ भागांतही प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीच्या ताफ्यात सध्या १५ हजारांहून अधिक गाडय़ा असून, त्यामध्ये ६१ वातानुकूलित बसेसचा समावेश आहे. साध्या बसेसखेरीज निमआराम व वातानुकूलित शिवनेरी बसेस एसटीच्या ताफ्यात आहेत.
(Loksatta)
Tuesday, February 16, 2010
Subscribe to:
Posts (Atom)