एसटीच्या ऑनलाइन तिकीट सेवेला उदंड प्रतिसाद : १८,५०० प्रवाशांची नोंदणी
महामंडळाने वेबसाइटच्या माध्यमातून सुरू केलेल्या ऑनलाईन तिकीट सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. अवघ्या २० दिवसांत १८ हजारांहून अधिक प्रवाशांनी वेबसाईटच्या माध्यमातून तिकिटे काढण्यासाठी नोंदणी केली आहे. दररोज किमान १०० तिकिटे वेबसाइटद्वारे काढली जात आहेत. वेबसाइटच्या माध्यमातून तिकिटे काढण्याच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना प्रथम नोंदणी वेबसाइटवर नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आजवर १८ हजार ५०० जणांनी एसटीच्या वेबसाईटवर नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे ही सेवा सुरू झाल्यापासून दोन हजार ५०० तिकिटे ऑनलाइन काढली आहेत. ऑनलाइन तिकिटांमध्ये वातानुकूलित आणि निमआराम गाडय़ांच्या तिकिटांची संख्या सर्वाधिक आहे.मुंबई-पुणे, पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक या मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित ‘शिवनेरी’ बसेसची सर्वात जास्त तिकिटे वेबसाईटच्या माध्यमातून काढण्यात आली आहेत. त्याखालोखाल पुणे-सोलापूर, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-रत्नागिरी, मुंबई-सातारा, नागपूर-अमरावती यासारख्या मार्गावर धावणाऱ्या निमआराम बसेसची तिकिटे ऑनलाइन काढण्यात आली आहेत. वेबसाइटच्या माध्यमातून साध्या गाडय़ांची तिकिटे काढण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे, अशी माहिती एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी दिली. या सेवेच्या माध्यमातून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, पंढरपूर, नाशिक यासारख्या शहरांतून सुटणाऱ्या सर्व गाडय़ांची ऑनलाईन तिकिटे काढता येतात. मात्र या शहरांखेरीज अन्य ठिकाणांहून परतीची तिकिटे काढता येत नसल्याने, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. एसटीने लवकरात लवकर सर्व ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी असे प्रवाशांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटनाने गेल्या ८ जानेवारी रोजी एसटीची ही सेवा सुरू झाली. पहिल्याच दिवसापासून तिला प्रवाशांकडून अतिशय चांगला प्रतिसाद लाभत आहे. मुंबई-ठाण्यातील बसस्थानकांखेरीज एसटीच्या राज्यातील २७ बसस्थानकांतून सुटणाऱ्या सुमारे २१०० बसेसच्या ऑनलाईन आरक्षणाची सुविधा त्यामुळे उपलब्ध झाली आहे. या वर्षी नोंव्हेबरअखेपर्यंत एसटीच्या ३२७ बस स्थानकांहून सुटणाऱ्या १० हजारांहून अधिक बसेसची तिकिटे या सेवेच्या माध्यमातून काढता येतील.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment