5 Dec 2009, 0707 hrs IST
म. टा. खास प्रतिनिधी
खासगी वाहतूकदारांच्या आव्हानांचा सामना करीत एसटी महामंडळाची पॉइंट टू पॉइंट सेवा जोरात सुरू आहे. भिवंडी, नाशिक, शिर्डी, पुणे, सातारा, अलिबाग अशा गर्दीच्या ठिकाणी सध्या दर अर्ध्या तासाने एसटी बस धावत आहेत. दादरहून पुण्यासाठी दर अर्ध्या तासाच्या अंतराने दररोज ६५ एसी बसेस धावत असूनही त्या अपु-या पडत आहेत.
एसटी महामंडळाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बसची संख्या वाढवली आहे. अलिबागमधील वाढती फार्म हाऊस आणि पर्यटकांचा ओढा लक्षात घेऊन मुंबई-अलिबाग मार्गावर सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत दर अर्ध्या तासाने सेमी लक्झरी बस सुटते. मुंबई-सातारा मार्गावर सकाळी साडेपाच वाजता सुरू होणारी सेमी लक्झरी बससेवा रात्री साडेबारापर्यंत सुरू असते. मुंबईहून स्वारगेटसाठी पहाटे चार वाजता पहिली बस सुटते. दर पंचेचाळीस मिनिटांनी बस धावतात. दर अर्ध्या तासाने दादर-पुणे रेल्वे स्टेशनसाठी औंध परिहार चौक मागेर् आणि दादर-पुणे-पिंपरी-चिंचवड मागेर् दर तासाला एसी बस सुटते. पुण्याच्या परिसरातील खासगी शिक्षण संस्था, उद्योग, शेती, आरोग्य खाते, क्रीडा खात्याचे मुख्यालय, इतर सरकारी कार्यालये यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. भिवंडीमधील पॉवरलूम व हँडलूमचा व्यवसायावर अवलंबून असणारे व्यापारी व कारागीर यांच्यामुळे दर अर्ध्या तासाने मुंबईतून बस सुटते.
पुण्याहून साता-याकडे जाणारी सेमी लक्झरी बस एकही स्टॉप न घेता जाते. बस सुरू होण्यापूर्वी स्टॉपवरच प्रवासी तिकिट घेतात. एकदा बस सुटली की थेट साताऱ्याला जाऊन थांबते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. पुण्याहून सोलापूर, बारामतीकडे दर अर्ध्या तासाने एक बस रवाना होते. पुण्याहून बोरिवलीला दर वीस मिनिटांनी बस सुटते. पहाटे साडेपाचपासून सतत बस धावतात. पुणे-ठाणे बससेवा सकाळी साडेसहा वाजता सुरू होते. या बसना मोजकेच स्टॉप असल्याने प्रवासी वेळेत पोहोचतात. पॉइंट टू पॉइंट बससेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता ही सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरल्याचे दिसते, असे एसटीचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस म्हणाले.
No comments:
Post a Comment