Friday, June 22, 2012

एसटीचा 'कॅरिअर' इतिहासजमा होणार?

http://www.esakal.com/esakal/20120622/5722942237507803852.htm

एकेकाळी टपावर मोठ-मोठ्या बॅगा मिरवत धावणारी एसटी आता अभावानेच दिसते. एसटीवरील कॅरिअरचा वापर करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे टपावरील कॅरिअर काढून आरामबसप्रमाणे गाडीच्या तळाशी सामान साठवणुकीची व्यवस्था करण्याचा विचार एसटी महामंडळ करीत आहे. तसे झाल्यास एसटीच्या प्रवासातील तो आणखी एक बदल ठरेल.

एकेकाळी एसटीच्या टपावर सामान सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाणारी कापडी ताडपत्री आता दिसेनासी झाली आहे. नव्याने आलेल्या एसटीच्या टपावरील कॅरिअरची जागाही आता कमी झाली आहे. लांबपल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या टपावरील सामानही आता कमी झालेले दिसते. त्यामुळे भविष्यात एसटीच्या टपावरील कॅरिअरच काढून टाकून खासगी आराम गाड्यांप्रमाणे गाड्यांच्या तळाच्या भागात सामानासाठी बंदिस्त जागा (डिकी) करावी का, अशा विचाराधीन महामंडळ असल्याचे दिसते.

एसटी ही सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. "बहुजन सुखाय, बहुजन हिताय' याबरोबर "प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी' अशी काही त्याची ब्रीदवाक्‍ये आहेत. ग्रामीण भागात आजही सर्वसामान्यांना एसटीचाच आधार असतो. कोणतीही कुरकूर न करता नियोजित थांब्यावरून प्रवाशांची वाहतूक सुरू असते. एसटीच्या रचनेत कालानुरूप अनेक बदल होत गेले. एसटीत चढण्यासाठी सुरवातीला पाठीमागे असलेला दरवाजा आता नव्याने आलेल्या गाड्यांना पुढे ठेवण्यात आला आहे. पूर्वी एसटीची आसन रचनाही विशिष्ट पद्धतीची होती. "थ्री बाय टू' अशी रचना होती. आता "परिवर्तन' नावाने आलेल्या एसटीमध्ये आसन रचना "टू बाय टू' करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी आराम गाड्यांप्रमाणे निमआराम गाड्या तसेच कमी भारमानाच्या मार्गासाठी मिडीबस काढल्या गेल्या. जुन्या काळात एसटीचा टपावरील सामान वाहतुकीसाठी असलेले कॅरिअरही बरेच लांबलचक व मोठे होते. त्या वेळी सामानाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असे. एसटी पार्सल वाहतूक सेवा तेजीत असायची. वाहतूक सेवा (ट्रान्स्पोर्ट) निर्माण होण्याआधी व्यापाऱ्यांचा मालही एसटी पार्सलनेच येत असे. यासाठी एसटीमध्ये स्वतंत्र पार्सल विभाग कार्यरत असे. एका ठिकाणाहून पार्सल केल्यावर त्याची पार्सल करणाऱ्याला पावती (रिसीट) दिली जात असे. ती पावती ज्याला माल पाठवलेला असायचा त्याला पोस्टाने पाठविली जात असे. त्यावेळी त्या पावतीवरून आपले पार्सल आल्याचे संबंधितांना समजत असे. त्या पावतीवरील व एसटीच्या पार्सल विभागात आलेल्या पार्सलवरील क्रमांक जुळल्यावरच पार्सल विभाग संबंधितांना पार्सल देत असे अशी सर्वसाधारण रचना असे. त्यानंतर वाहतूक सुविधा विस्तारित झाल्यानंतर एसटीचा पार्सल विभाग हळूहळू बंद झाला. त्यामुळे पूर्वी एसटीच्या टपावरील कॅरिअर मोठे असे. सामानाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असे. सामान वाहतुकीसाठी एसटी हाच एक आधार असे. त्या वेळी पावसाळ्यात टपावरील सामान भिजू नये, यासाठी ताडपत्र्यांची सोय असे. विशेषतः लांबपल्ल्याच्या गाड्यांवर ताडपत्र्यांची सोय असायची. त्यानंतर नव्याने दाखल झालेल्या एसटीच्या टपावरील कॅरिअरची जागा कमी झाली. याचबरोबरच ताडपत्र्याही गायब झाल्या. त्यामुळे एसटीच्या खर्चात मोठी बचत झाली. आवश्‍यक तेव्हा स्थानिक पातळीवर प्लास्टिक कागद उपलब्ध करून दिले जात. आता तर एसटीच्या टपावरील सामान वाहतुकीची कॅरिअरच काढून टाकावे, या विचाराधीन महामंडळ आहे. कॅरिअरमुळे गाड्यांच्या गळतीचे प्रमाण वाढून त्यावर वारंवार खर्च करण्याची वेळ येते. खासगी आराम गाड्यांमध्ये सामान ठेवण्यासाठी बाजूला व मागे असलेल्या जागेप्रमाणे बंदिस्त जागा ठेवावी का, या विचारात महामंडळ आहे. तसे झाले तर सामान सुरक्षित जाऊ शकेल. जादा टायर (स्टेफनी) तसेच टूलकिट आत ठेवता येईल. त्यामुळे वाटेत एसटी पंक्‍चर झाल्यावर करावी लागणारी कसरत थांबेल. एसटीच्या खर्चात मोठी बचत होईल. प्रवाशांनाही सामान ठेवणे तसेच स्वतःच ते हाताळणे सोपे जाईल. अशा पद्धतीची रचना करण्याबाबतचा विचार सुरू असून, लवकरच त्याचे प्रत्यक्षात रूपांतर होईल, अशी स्थिती आहे.

...तर हमालांवर गदा एसटीच्या टपावर सामान चढविण्यासाठी हमालांची गरज भासते; मात्र एसटीने खासगी आराम गाड्याप्रमाणे सामान ठेवण्यासाठी खाली बंदिस्त जागा केल्यास प्रवाशी स्वतःच आपल्या सामानाची हाताळणी करतील. पर्यायाने हमालांना काही काम न राहिल्यास त्यांच्यावर गदा येण्याची शक्‍यता आहे.